काय करु सांगना ? कुणास सांगु सांगना ?

( चाल : कैद में है बुलबुल . . . ) 
काय करु सांगना ? कुणास सांगु सांगना ? 
उतावळे मन आता , काही केल्या राहिना ! ॥धृ०॥ 
कोणीतरी बोलले , प्रभू आम्ही त्यास पाहिला । 
आम्हासवे हासला नि आम्हासवे जेविला । । 
कोणीतरी बोलले , प्रभू आम्ही पाहिला । 
कोठे दळू लागला नि ढोरे ओढू लागला । । 
आम्ही काय केले पाप , म्हणुनि भेट होइना । 
उतावळे मन आता , काही केल्या  राहीना ! ll१ll
कोणीतरी बोलले की , भक्ति त्यास पाहिजे । 
अहोरात्र निज - ध्यास , ध्यानि - मनी राहिजे । । 
काम - क्रोध - लोभ - मोह - मत्सरादि नाही जे । 
आशा - पाश निवारोनी साधनीच राही जे । । 
आम्ही तरी दुजे काय केले पाप पाहिना । 
उतावळे मन आता , काही केल्या राहिना ! ॥२॥ 
कोणीतरी बोलले की , योग - याग करावा । 
तीर्थाटनी भ्रमोनिया मग देव पहावा । । 
कोणतेहि रूप धरा , विश्वास हा ठसावा । 
बोले तैसा चाले त्यासी सन्देश हा पुसावा । । 
तुकड्यादास म्हणे - सगळी वेडावली भावना । 
उतावळे मन आता , काही केल्या राहिना ! ।।३।। 
                                      - नागपूर , दि . ०७ - ०९ - १९५९