देव हा पहातो मजकडे !

( राग : मांड ; ताल ; अध्धा तीन ताल . ) 
देव हा पहातो मजकडे ! 
नेत्र भरोनी येती सगळे , 
वाहतो पूर प्रेमाचा दुथडे ! ॥धृ०॥ 
सात्विक श्रध्दा हृदयी उसळे । 
सुमनांचा सद्विचार द्रवळे । 
दाटूनि दाटूनि कंठ उफाळे । 
प्रगटले    ते   रुप   सावळे ॥१॥ 
मी पाहतो तो पाहतो मजसी । 
भेदचि नाही जणु दोघासी ! । 
एकचि झाले दोन आकडे । 
मिटले जणु जन्माचे कोडे ॥२॥
आड नका हो येऊ कोणी । 
भरले मन हे आनंदानी ।। 
तुकड्यादासा इकडे - तिकडे । 
चोहोकडे प्रभुचे  पोवाडे ! ॥३॥ 
                                   - गुरुकुंज , दि . ०४ - ११ - १९५९