कोण तुझा सांगाती ? रे !
(चाल: काहे को तिरथ जाता रे भाई )
कोण तुझा सांगाती ? रे ! शेवटी कोण तुझा सांगाती ।।धृ।।
वेड्या मनावर ठेवुनि विश्वास, करिशी का जिवनाची माती ।
क्षण - क्षण ऐसा घाली फुकाचा, शोध करी एकांती ।।
रे ! शेवटी कोण तुझा सांगाती ? ll१।।
स्वार्थ - सुखाचे गणगोत सारे , संकटी माघारी जाती ।
दुःख भोगाया तूच तुझा मग , कोणी न धावुनी येती ।
रे ! शेवटी कोण तुझा सांगाती ? ।।२।।
विषय - वासना जरा सोडीना , जिवंत जाळील छाती ।
अंतकाळी मग केविलवाणी , पाहसी कुणा भोवती ! ! रे !
शेवटी कोण तुझा सांगाती ? ।।३।।
सद्गुरुबोधा वाचूनि नाही , तिळमात्र कोणा शांति ।
तुकड्यादास म्हणे हो सावध , संतची तारिती अंति ।
रे ! शेवटी कोण तुझा सांगाती ? ll४ll
- प्रवरानगर , दि . १४ - ०९ - १९५९