कृष्ण उध्दवा म्हणे सांगतो स्वहीत बा ! अपुले
(चालः कसा निभवसी काळ कळेना..)
कृष्ण उध्दवा म्हणे सांगतो स्वहीत बा ! अपुले ।
ज्या मंत्राने नारद वाल्मिक संदिपान तरले ॥ धृ 0॥
किती सांगु तुज ? भक्त असंख्यहि माझे बा ! झाले ।
या नामाते जपता जपता वैकुंठी गेले ॥१॥
अहंकारि हा भ्रमला प्राणी करितो न विवेक ।
सत्य गम पण नश्वर सारे सांगु काय अधिक ?
चुकेल जेणे चौऱ्यांर्शी ते करिति न बा ! कोणी ।
म्हणतो देव ठेव परि न कळे अहंभाव - गोणी ॥२॥
अंगाने नित चैन भोगि सांगे ब्रह्मज्ञान I
तया नरास्तव केले उघडे यमकुंडी भुवन ।।
ऐक तुला ही खूण सांगतो बोले न कुणासी ।
स्मरता चतुराक्षरासि चुकविल जन्ममरण फासी ॥३॥
नाव तयाचे अजपा बापा ! काय सांगु तुजसी ?
ध्रुव प्रल्हाद- परीक्षिति तरले वसिष्ठ तत्त्वमसि ॥
पुढे कलिमधे जे कोणी नर हाच रोग करिती ।
कितीहि भवपुर असो उध्दवा ! सत्वर ते तरती ॥४॥
नव्हेच खोटे सत्य जाणरे ! आण देवकीची ।
तुकड्यादासहि चाखुनिया रस जपे मंत्र हाची ।।
सोपे सांडुनि गहन धरिती जे व्यर्थ फजित झाले ।
ज्या मंत्राने नारद वाल्मिक संदिपान तरले ॥५॥