कोठवरी पाहशी आपुलिया मानसी ?

( चाल : घटा घनघोर घोर ... )
कोठवरी पाहशी आपुलिया मानसी ?
भाव कसा नेणशी ?
विठोबा ! का न जरा बोलशी रे ? ॥ धृ०॥
भयभीत हे जगत बिचारे काहि सुचेना कोणा ।
काय पुढे होणार आहे म्हणुनी आली दैना ?
लोक झाले आळशी विषयांचे हावशी
भाव कसा नेणशी ?
विठोबा ! का न जरा बोलशी रे ? ॥१॥
कोणाला कोणाची पडली कोणा पडली घरची ।
कोणा पडली गरीबगुदांची कोणाला सासुरची ।
ज्यासि त्यासि जाणशी बघोनी उदासशी
भाव कसा नेणशी ?
विठोबा ! का न जरा बोलशी रे ? ॥२॥
शुरवीर अणि जपी तपी हे कर्म कराया भुलले ।
तत्वज्ञानिही गेले सगळे विरळे कोणी उरले I
उदासले मानसी वेळ आलीका अशी ?
भाव कसा नेणशी ?
विठोबा ! का न जरा बोलशी रे ? ॥३॥
निसर्ग अपुले पायबंदहि सोडु पाहतो जगती I
तुकड्यादास म्हणे ऋषिसाधु स्वस्थ बसुनी बघती I
स्फूर्ति दे तया तशी काय मनी इच्छिशी 
भाव कसा नेणशी ?
विठोबा ! का न जरा बोलशी रे ? ॥४॥