आवडला देव ज्याला त्याला कोणते उणे ?
(चाल : वनवासी राम माझा.. )
आवडला देव ज्याला त्याला कोणते उणे ? ॥धृ0॥
करिल कल्पना ते पावे क्षण न लागता फल यावे ।
काय हे कुणा सांगावे अनुभवाविणे ! ॥१॥
त्याग वासनेचा केला ब्रह्मरुप तोची झाला ।
भोग- भाव कैचा त्याला आवडे मने ? ॥२॥
शांतता मनासी आली विषय-वासनाही निमाली ।
पूर्णता जिवाची झाली आत्म - तर्पणे ॥३॥
सकल सृष्टि त्याची झाली भेद भावनाच उडाली ।
पावला जिवे वनमाळी साधले जिणे ॥४॥
रंगी रंगला तुकडयाच्या भावनात ज्यांच्या त्यांच्या ।
दूर ना असुनि कोणाच्या प्रगट चिंतने ॥५॥