ओळख रे ! पाऊल काळाचे धसधस जातो कुठे ।
( चाल : हटातटाने पटा रंगवूनि ...)
ओळख रे ! पाऊल काळाचे धसधस जातो कुठे ।
सोडूनी मार्ग नीट चोखटे ॥धृ0॥
गुलामगिरीच्या तोडुनि बेडया स्वतंत्र केले तुला ।
याचसाठी का बावळ्या मुला ?
श्रमदानाची लाज वाटते ओंगळ वाटे मला ।
म्हणूनी का कतरत जातो खुला ?
कोण उठे हो प्रातःकाळी आळस मनि व्यापला ।
आईबापासि चिडुनि बोलला ॥
( अंतरा ) हे असेच नरविर राहाल का रे अता ?
अंगात न तिळभर शक्ती बुद्धिमता ।
शौकिनीत जाझ्ल सारी ही संपदा ।
मग मागाया भीक निघा जरी कोण देइ खरकटे ?
सोडूनी मार्ग नीट 0 ॥१॥
अदम्य शक्ती अगम्य बुध्दि अजिंक्य युक्ती तुम्हा ।
पाहिजे तरूणा विरोत्तमा ! ॥
लाथ मारू तव पाणी काढू अम्हि असे बोल बोलना ।
गर्जु द्या गगनि देशगर्जंना ॥
समयदान अन् धनदानाने भूदानाने म्हणा ।
नटवू हा देश धरूनि आपणा ॥
घराघरातुनि निर्मल जन हे देशासाठी जमा ।
करू अम्ही स्मरूनी पुरूषोत्तमा ॥
(अंतरा) हे मंत्र धरूनी कार्य ध्या करी।
चमकु द्या तरुण हो ! भारत विश्वातंरी ।
होउ द्या वासना प्रिय बापुंची पुरी ।
तुकडयादास म्हणे तरि शोभा बघाल चोहीकडे ।
सोडुनी मार्ग नीट 0 ॥२॥
- गुरूकुंज आश्रम दि. ०६-११-१९५५.