आला चालतांना शीण तुला पाहता रात्रंदिन ।

(चाल: लेके पहिला पहिला प्यार.. )
आला चालतांना शीण तुला पाहता रात्रंदिन ।
झालो जीवनी उदास जैसा पाण्याविणा मीन ॥धृ0॥
कासया करावे जप - तप वाटे ?
आजवरी केले तरी प्रभु का न भेटे ?
कोणा मागावे हे दान कोण देईल वरदान I
झालो जीवनी उदास 0 ॥१॥
संती सांगितली मात देव ठायी ठायी ।
परि अभाग्यासी कैसा तो कळला नाही ?
कोण देईल हे ध्यान ? व्हाया मना समाधान ।
झालो जीवनी उदास 0 ॥२॥
एकांति लोकांति बसलो जाऊन ।
केली उपासना मन व्हावया उन्मन ।
म्हणे तुकड्या कंठी प्राण आला कोणी द्या जीवदान I
झालो   जीवनी   उदास ॥३॥
प्रवास दि.२१-०३-१९५७