का धरिशी मनि कोप दयाळा !
(चाल: पतीत पावन नाम...)
का धरिशी मनि कोप दयाळा ! वद गिरिजा - रमणा ! ।
नको दुरावू दीन अभाग्या, घे अपुल्या चरणा ॥धृ०॥
तात-मात-गणगोत तुझ्याविण, कोणि नसे वाली ।
का लोटियशी निष्ठुर होउनि, कृपणा वनमाली ! ।।१।।
सोडुनिया तव चरण दयाळा ! जाउ कुठे रानी ? ।
निर्बळासि भय दावुनि म्हणशी मजला नच मानी ।।२।।
नको मला हा प्रपंच - भारा, तुझ्या मायिकांचा ।
येउनिया दे भेट कृपाळा ! निश्चय अंतरिचा ॥३॥
भक्त-काम-कल्पद्रुम म्हणविशि, वेद- मुखेकरुनी ।
तुकड्याची ही आशा पुरवी, भव ने हा हरुनी ।।४॥