कुणि सांगिना पता हरिच्या, गावि जावया
(चाल: दिवाना बनाना हो तो...)
कुणि सांगिना पता हरिच्या, गावि जावया ।
मन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया llधृ०ll
म्हणताति संतही देती, मार्ग दावुनी ।
इतुका करा उपकार, तया भेटवा कुणी ।
अर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ।।१।।
रानी वनी कुणी फिरती, साधिती तपा ।
दरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा ।
परि दूर हरी हा न दिसे, कष्ट करुनिया l।२।।
कुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी ।
परि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी ।
तुकड्यासि दया द्या इतुकी, लाभवा तया ।।३।।