कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का

(चाल: अगर है ग्यान को पाना...)
कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ? ।
सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती llधृ०।।
न कोणी वीर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी ।
लूटती चोर मनमाने, न त्यांना  ये   दया   खंती ॥१॥
मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली।
बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुखे फिरती ।।२॥
मिळेना अन्न कोणाला कुणी धन साचुनी ठेवी।
प्रेम स्वार्थाविना कोठे, कुणाचे  ना   कुणावरती ॥३॥
न साधू बोध दे कोणा, मौन धरि बघुनि पापासी ।
तो तुकड्यादास सांगतसे, तुझ्याविण ना मिटे भ्रांती ।।४॥