करूणेच्या सागरा, योगी-मनहरा! भला छंदी।

(चाल; घनश्याम सुंदरा श्रीधरा..)
करूणेच्या सागरा, योगी-मनहरा! भला छंदी।
दावुनिया जगतास लिला, मन लावियले नादी।।धृ०।।
अजब घातले दुकान जग हे नाना रुपवर्णी।
एकापासुनि अनेक करिसी अजब तुझी करणी।।
प्रथम बीज ओंकार संचला स्फूर्तिरुप धरुनी।
अजब वाढला वृक्ष थोर हा न दिसे या नयनी।।
बीजापासुनि वृक्ष काढिसी वृक्ष बीज-साठे।
बीजरूप हे तुझे संचले या जगती वाटे ।।
गणपती मुळी जाहला, पाहता।।
ब्रह्मा लिंगी बसविला, पाहता ।।
नाभित विष्णु स्थापिला, पाहता ।।
स्फुरणाचे मुळ स्थान वेष्टिले, अंत:करण बंदी । दावू०।।१॥।
भोला शंकर हदय-स्थानी करुनी कैेलास।
मनादीक ही भुते घेउनी करीतसे वास।।
या पिंडीचा जीव कंठ-स्थानात उभा केला।
भली लाधली वेळ जिथे अज्ञातवास झाला।।
पुढे लागली वाट, अजब तो घाट; चहूफेरी ।
जिला सर्वही म्हणती माया, तीच तिचे द्वारी ।।
संगमी मोज वाटते, पाहता !।
पाहता नेत्र आटते, पाहता।।
झुरझुरा मधू-लाट ते, पाहता।।
गगनमंडळी खूब गर्जना, कैेसि दिली संधी ।।
त्रिकुट-घाट श्रीहाटावरि गोल्हाट औटपीठ ।
झगमग झगमग भानु उदेला, पहा पहा नीट ।।
ब्रह्मारंध्र झकदार, सर्व व्यवहार शून्य तेथे ।
निर्गुण-सगुणी-वाद निमाला, मी-तू नच जेथे ।।
अजब गडी करतार कमाई दिधली भु वरते ।
चीडी पासुनी ब्रम्हा वरतो नाही दुजे जेथे
(अंतरा) वेदही मौन जाहला, पाहता ।।
संत तो गुंग बैसला पाहता ।।
मुकरूप-रुपी गुंगला पाहता ।।
तुकड्यादास म्हणे या, लागा स्वरूपाचे छंदि ।। दावू ०।।3।।