अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली
(चालः अगर है ग्यान को पाना..)
अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली ।
लागला ज्वाळ हृदयाला, वेळही कायशी उरली ? ।।धृ०।।
गमे हा मार्ग हिंदूंचा, बिघडला लोपता झाला ।
पाहती तोंड दुसऱ्याचे, सोडुनी नीति ही अपुली ॥१॥
कुणी त्या चर्चला जाती, कुणी पुजताति पीराला ।
आपुली सोडुनी नीती, हिंदुची भ्रष्ट मति झाली ॥२॥
न यांना धर्मही कळतो, समाजी देह ना वळतो ।
ठावे राजकारण ते, गती अधरापरी झाली ।।३॥
कारणहि व्हावया ऐसे, एकची वाटते मजला ।
वारतंत्र्यी भारत-भू ही, आपुली माउली पडली ।।४॥
करा हो एकमेकांना, संघटित प्रेम लावुनी ।
जागवा राष्ट्र-भक्ती ही, म्हणे तुकड्या त्यजा भूली ।।५॥