उठा रे हिन्द - पुत्रांनो ! चला सांगू प्रभूपाशी

(चाल : करा काही कृपा आता...)
उठा रे हिन्द - पुत्रांनो ! चला सांगू प्रभूपाशी ।
प्रभू का कोपला ऐसा? जरा ना सौख्य आम्हासी ॥धृ०।।
उडाली भूमिची सीमा, पिकेना तिळभरी शेती ।
खर्च ही ना निघे काही, राहती लोक  उपवासी ।।१।।
सदाचा त्रास हा देहा, गुलामी सान थोराला ।
नृपाचा धाक बहु मोठा, गांजितो फार जनतेसी ।I२ll
विषारी चित्त जनतेचे, पसरले वैर-वन सारे ।
निघाले वृक्ष पापांचे, फळांच्या वाढल्या   राशी ।।३॥
गुप्त हे जाहले साधू, भंदुचा भार बहु झाला ।
नीतिशास्त्रा-पुराणांची, फजीती वाढली  खाशी ।।४।।
जगाला सौख्य तरि द्यावे, नाहि तरि मृत्यु अर्पावे ।
हाल हे नावरे आता,   भारताची   गती   कैसी ? ॥५॥
म्हणे तुकड्या चला गाऊ, आपुली खास ही दैना ।
सखा तो तारि भक्तासी, पुराणे    गर्जती   ऐसी ।।६।।