काननी या नदीच्या तटी कोणि केली तृणाची कुटी ?
(चालः रुसलासी हरी का बरे ... )
काननी या नदीच्या तटी कोणि केली तृणाची कुटी ? ॥धृ0॥
बाग वसंत - ऋतुचा नवा जैसा शालू दिसे हिरवा ।
वृक्ष - वेली डुले गोमटी रम्य वाटे मुळांच्या लटी ॥१॥
भृंग गुंजार करिती वनी कोकिळा गातसे रागिणी ।
श्यामता बादलांची उठी मयुर पिंजारती पंखुटी ॥२॥
मंद पवने टपकती फुले खेळती वानरांची पिले ।
धावताती निराच्या तटी मारुनिया उड्या कोल्हटी ॥३॥
पुष्पि गुंजारती भोंगुळे शुभ्रवर्णी निळे पीवळे ।
शोभती वृक्षियांच्या पटी उडति पक्षी - कुळे गोमटी ॥४॥
मागे शीला किती भव्य ह्या व्याघ्र सापादिकासी पहा ।
धावती अस्वला रानटी गर्जती जंबुके धाकुटी ॥५॥
रम्य त्या डोंगराच्या दऱ्या चरति रोही हरिणी सांबऱ्या ।
वाहताति झरणे चोरटी भवति कंदामुळांच्या गुटी ॥६॥
मधि सिंहासने साजिरी कोण बसताति यांच्या वरी ? ।
जणु स्वर्गाचि ही चौपटी प्रेम लागे किती या मठी ॥७॥
सृष्टिसौँदर्ये ही ओतली रम्य - भू भोवती शोभली ।
साठवावी गमे संपुटी साधुनीया तपस्या तटी ॥८॥
दास तुकड्या मनी गुंगला पाहता रंगि या रंगला ।
मुक्ति लाभो इथे शेवटी नाम - स्मरणी न होवो तुटी ॥९॥