कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे

(चालः आशक मस्त फर्कीर हवा...)
कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे, नच साधु ढळे हरिच्या भजना ॥धृo॥
वाहताति कुणी फल, पुष्प शिरी, कुणि भावबळे घरि ने अपुल्या ।
कुणि निंदिति मार्गि, शिव्या वदनी, सुखदुख न होय जराहि मना ।।१।।
कृणि देति किती, कृणि नेति किती, कुणि खाति किती, गणतीच नसे ।
कधि लाडु पुरी, कधि भूक उरी, कळणा - घुगरी हरि देत तना ।।२।।
कुणि मान कराया नेत सभे, कुणि प्राण हराया नेत गिरी ।
समतोल तयाची वृत्ति सदा, नच द्वेष प्रिती कुजना-सुजना ।।३॥
शित-उष्ण असो वा वृष्टि असो, जनलोक असो वा कानन हो ।
मरणी जननी नच खेद जिवा, सदनीहि जसा तेसाचि रणा ।।४।।
नच रंग कधी विसरे अपुला, आनंदस्वरूप अनादि सदा ।
पदी लीन तया तुकड्या नमुनी, ज्याच्या न कळे कवणास खुणा ॥५।।