मज नको नको ही आशा, व्यर्थ तमाशा कासया
(चाल: ना छेडो गाली देऊंगी..)
मज नको नको ही आशा, व्यर्थ तमाशा कासया ?।।धृ० ।।
जमवूनी द्रव्य-धन-दारा, घरदार-शेति-परिवारा ।
मग लुटती चोर पसारा, हा भव-भारा कासया ?।।१॥।
जे मिळेल तेची खावे, प्रभु-पदी लीन वागावे ।
ही वेळ सुखे निभवावे, मायिक पाशहि कासया ?।।२॥।
जरि दु:ख शरीरा झाले, तरि सहन करावे घाले ।
तुकड्याने तन अर्पियले, दुसऱ्या द्यावे कासया ?।।३॥।