काढुया सूत घरोघरी, वापरु ग्रामीण खादी बरी

(चाल: तु येशिल केव्हा तरी...)
काढुया सूत घरोघरी, वापरु ग्रामीण खादी बरी ।।ध्रुll
खादीच्या रुपे भारती, वाचवू  द्रव्य   अगणिती ।
गरिबांस पुरवू भाकरी, वापरु ग्रामीण खादी बरी ।।१॥
उद्योगी जना लावूनी, ग्रामीण - कला जगवूनी ।
लाभवू सुराज्या करी, वापरु ग्रामीण खादी  बरी ।।२॥
गांधीचा मंत्र हा जुना, येउ द्या गडे   हो   मना ।
मन लावूनी चरख्यावरी, वापरु ग्रामीण खादी बरी ॥३॥
आपुलाच माल नेऊनी, भोगती मजा परधनी ।
ठेविती गुलामी शिरी, वापरु ग्रामीण   खादी   बरी ॥४॥
समुदाय - प्रार्थना जशी, ही सुतकताई तशी ।
करू घरोघरी साजिरी, वापरु ग्रामीण खादी   बरी ॥५॥
तुकड्याचि हाक घेउनी, खुणगाठ मनी बांधुनी ।
लाभवू भाग्य है करी, वापरु ग्रामीण   खादी   बरी ।।६॥