कुठवरि भजतिल लोक तुला हरी !

कुठवरि भजतिल लोक तुला हरी ! अंत तरी पाहणार किती !
गेली रे हिंमत जनतेची । हवालदिल सगळ्यांचि मती ॥ध्रु।।
भजन-पुजन तर सोड गचा ? पण तू नाहिस ऐसे म्हणती ।
असता तू तर का है होते, पाप पोर जगतात अती ? ll
भरदिवसा मरतात किती अन्नाविण त्यांची ना गणती ।
कितितरी लोक लुटारु - भाई, धान्ये कोठारी भरती ।।
एक सुखी आणि एक दुखी, ही न्यायरीत । राहील किती ? l
गेली रे हिंमत जनतेची, हवालदिल सगळ्यांचि मती ॥१।।
उद्योगीजन भिकार फिरती काम नसे त्यांना काही l
राक्षस - यंत्रे शिरली, तेव्हापासून गति त्यांची नाही ।।
कष्ट करोनी शेती करावी, पुरे न कवडी जरा मिळे ।
असले नसले सावकार ने, राहु - केतु टपती सगळे ।
त्यातुनि काही राहि धान्य तर, सत्ताधीश वरी उसळे ।
ला साले ! म्हणुनिया घरांमधि घुसुनि धान्य नेती सगळे ।।
चिले पिले अन्नाविण मरती ! पहावेना हे हाल अती ।
गेली रे हिंमत जनतेची, हवालदिल सगळ्यांचि मती ।।२।।
गुणीजनांना मान मिळेना, गुंड किती   डोई   चढले ।
घराघरामधि राज्य आपले-समजूनि हत्तीसम झाले ।।
हम बोले सो करो म्हणोनी फंद - फितूरीने   लढले ।
पडले कितितरी काहि सुचेना साह्य नसे म्हणुनी नडले ।।
कळते पण बल नाहि जरा, तोंडावरि हात धरुनि अडले ।
अरे-अरे ! - म्हणता अपुलाले, हक्क सोडुनिया पडले ।।
काय दशा ही या जगताची ! ना कळते कळणार किती l
गेली रे हिंमत जनतेची ! हवालदिल सगळ्यांची मती ।।३॥
धर्मलंड पोटाकरिता फिरतात, न त्यांना ज्ञान   असे ।
अपुल्या स्वार्थासाठिच भोंदू, साधू होऊनिया विलसे ।।
द्रव्य मिळे तो धर्म आणि अधिमान मिळे तो न्याय असे ।
बडबडती तत्वाविण मीठे बोलूनिया पाषाण जसे ।।
स्वत:कळेना अणि कळू दे ना, या कामा बलवान तसे ।
दयामया मुळि नाही जयांना, राष्ट्र मरो की जगो कसे ।।
सज्जन अपुले भिऊनि-भिऊनी, काय करु ? सगळे म्हणती ।
गेली रे हिंमत जनतेची ! हवालदिल सगळ्यांची मती ।।४॥
चहुबाजुनि हा घोर पसरला, धर्मकर्म   मिटले   सारे ।
तत्वांचा पाया ढासळला, शिरले   परक्यांचे   वारे ।।
देव नको अणि भक्ति नको, हे ज्ञान वाढले बहुजोरे ।
ज्या मार्गाने दिवस भागतो, तेच - तेच करिती  सारे ।।
काय हाल होती जनतेचे, सर्व तुला कथिले  बा   रे !
करी काय वाटे ते आता, जगणे आता   नाहि   बरे ।।
तुकड्यादास म्हणे आशेवर जगलो- हरि येईल जगती ।
गेली रे हिंमत जनतेची ! हवालदिल सगळ्यांची मती ।।५॥