उभा सामुरी मी तुझ्या दर्शनाला

( चाल : धीरेसे आजारे . . ) 
उभा सामुरी मी तुझ्या दर्शनाला , 
अति लाजही वाटते या मनाला । । धृ० ॥ 
कितीदा तरी ऐकली गोड वाणी , 
परी एकही राखली नाहि कानी । 
पुन्हा दाखवू तोंड का मी तुम्हाला ? अति लाज ॥ १ ॥ 
तुम्ही आपुला देह कष्टी करावा , 
फिरोनी जना नित्य उपदेश द्यावा । 
परी मूर्ख मी , बोध अजुनी न झाला , अति लाज ॥ २ ॥ 
अशी शक्ति द्या की स्फुरे भावभक्ति ,
कराया सदाचार द्या अंगी शक्ति,
तुकड्या म्हणे काय बोलू कुणाला ? अति लाज ॥ ३ ॥
- निजामाबाद , दि . १३ - ०१ - १९५५