उमगलं, उमगलं, उमगलं जगाचं कोडं
(चाल: जीवन है, जीवन है...)
उमगलं, उमगलं, उमगलं जगाचं कोडं ।।धृ०।।
जग हे स्वार्थ विषानं भरलं ।
मायामोहवशानं वरलं ।
जाती - पंथ - पक्ष - शिरुनिया, लागलं वेड ।।१।।
जो तो व्यक्तितत्वानं भरला ।
राष्ट्रियभाव नसे मुळी उरला ।
माणुसकिचा तुटवडा पडला, दिसे जन भ्याड ।।२॥
याला मंत्र हवा समतेचा ।
बंधुत्वाचा, मानवतेचा ।
जाईल रोग तरिच हा साचा, कळलं थोडं ।।३॥
या रे जन हो ! प्रार्थू सगळे ।
करुनी समुदायाचे मेळे ।
पसरुनि सेवामंडळ - जाळे, हटवु पाखांड ।।४।।
मिटवुनि भेदभाव हा सारा ।
साजवु देशधर्म- सुविचारा ।
तुकड्यादास म्हणे हा, तरीच पसारा गोड ।।५॥