का व्हावे हो लहान ? आम्ही भारतव्यापी महान

(चालः ओरडूनी सांगावे देवा, काय तुम्हा नच ठावे...)
का व्हावे हो लहान ? आम्ही भारतव्यापी महान।।धृ०ll
हातपाय हे तोडुनि, तोडूनी, दिसू काय अम्ही छान ?
जो तो अपुलिच मिरविल प्रौढी, एकाहुनि एक ताण ।। आम्ही0॥१॥
अभिन्न राहनि, उन्नतीसाठी, करू व्यवस्था-स्थान ।
भेदभाव मग का समजावा ? व्यर्थचि हा अभिमान ।। आम्ही०॥२॥
शिशुबुद्धीपरि झगडत बसणे, मला दिसे नादान ।
विशाल व्हावे म्हणुनिच दिधले, राज्य गांधिने दान ।। आम्ही0॥३॥
भारतास हे विश्व जोडण्या, करू सदा प्रभु-ध्यान ।
तुकड्यादास म्हणे निष्ठेने,  देईल  प्रभु - वरदान ।। आम्ही०॥४॥
      दिल्ली रेल्वे प्रवास, दि. 0६-११-१९५५