आवडे मनाला ध्यान ते, ना विरो भान ते

( चाल : माझिया प्रियेचे . . ) 
आवडे मनाला ध्यान ते , ना विरो भान ते ॥ धृ० ॥ 
कमलनयन , कमलवदन , कमलकर नि कमलचरण । 
पीतांबर अति प्रसन्न , बघता   मन    मोहते । आवडे० ॥ १ ॥ 
मुरलीची मधुर तान , अधरावरि करित गान । 
ऐकुनि वेडावि   प्राण ,   देहदृष्टि     हरविते । आवडे० ॥ २ ॥ 
रत्नजडित मोरमुकुट , कंठि वैजयंति नीट । 
बघता हे रुप अविट , तुकड्या नत हो तिथे । आवडे० ॥ ३ ॥
- वरोरा , दि . २६ - ०९ - १९५४