आधी बीज, मध्ये बीज, शेवटी बीज रे !

                (चाल-अगा सगुणा निर्गुणा)
आधी बीज, मध्ये बीज, शेवटी बीज रे ! निर्मळ ।
                              तैसे ब्रह्म सर्वकाळ ॥धृ०।l
निराकारी तत्त्वजात । सगुण रूपे वृक्ष होत ।
पुढे लय होता   त्यात । बीज   उरे   सर्वही ॥१॥
एका बीजाचा तो वृक्ष । हजार होती,जग साक्ष ।
तैसा ब्रह्माचाही पक्ष । ऐसे  संत   बोलती ॥२॥
जेव्हा तत्त्व नव्हते काही । स्थूल जागृतीही नाही।
तेव्हा सूक्ष्म ब्रह्म राही । सर्वकाळ तेथे रे ! ॥३॥
ॐशब्दाच्या पासुनी । झाली प्रगट मायाराणी ।
तीन गुण ते घेऊनी । आली तत्त्वे  रचाया ।।४॥
हंस रूपे केला गुरु । हंस तोचि बीजा पारू।
चाले तत्त्वांचा व्यापारू । तया बीजापासूनी।॥५॥
आधी हंसरूपे बीज । झाले सगुण सहज।
ऐसे पृथ्वीचे जहाज । चाले  पूर   का   जैसा॥६॥
तुकड्या म्हणे वृक्ष मोठा । वरदायी गुप्त होता ।
पिंड ब्रह्मांड तत्त्वता । एकवीस हजार श्वास ते ॥७॥