कुणी फावडे घ्या, कुणी टोपली घ्या

( चाल - कुणी गोविंद घ्या , कुणी गोपाळ घ्या . . ) 
कुणी फावडे घ्या, कुणी टोपली घ्या,
कुणी कुदळी घ्या,या रे ! धावुनी ।। धृ० ॥ 
रासलीला ही याच युगाची । श्रमदानाची , धनदानाची । 
हाती काम नि मुखि    गाणी ॥ १ ॥ 
गोपाळाचे तुटके घर हे । पाणि - हवेने अति जर्जर हे । 
बांधुनी काढू    सर्व    झणीं ॥ २ ॥ 
लैन धरोनी टाका दोरी । ओटे - उकिरडे घ्या माघारी । 
सुंदर सजवू    गांव    गुणी ॥ ३ ॥ 
स्वच्छ करु हे घर - घर सारे । टापटिपीने सजवु दारे । 
सुंदर अक्षरि लिहू     म्हणी ॥ ४ ॥ 
रांगोळी दारावरी घाला । सांगा तारा - शांति मीरेला । 
मार्ग   दाखवू     शोभवुनी ।। ५ ।। 
चला चला रे ! त्वरा कराना । काम करोनी करु मग स्नाना । 
राहु   उभे,    सांगु    नमुनी ॥ ६ ॥ 
श्रमदानाने विहिरी बांधू । जीर्ण मंदिरे उत्तम साधू । 
विद्यामंदिर    बांधू     झणीं ॥ ७ ॥ 
जीर्ण अखाडे फिरुनि सुधारु । आरोग्यालय मिळूनि उभारु । 
राहू नका   माघारि   कुणी ।। ८ ।। 
सर्व मिळोनि करु श्रमदाना | ब्राह्मण - क्षत्रीय - वैश्यही याना । हरिजन घ्या अपुले म्हणुनी ॥ ९ ॥ 
या बंधूंनो ! या भगिनींनो ! वडिल जनांनो ! ऋषि - साधूंनो । 
तुकड्या म्हणे उठा झोपेतूनी ।। १० ॥
- पुसद , दि . १९ - ०२ - १९५५