कशास फिरशी वनवन, वेणू घेउनि गायीसवे ?
( चाल : कुरण तेरे . . . )
कशास फिरशी वनवन , वेणू घेउनि गायीसवे ?
काय तुला संकष्ट पातले ? सांग तरी मज जीवे । धृ० ।।
सोडूनि कटिचा पितांबर तो , वृक्षसाल घालशी ।
रत्नजडित मुकुटास काढुनी मोरतुरा लाविशी ।।
दही दूध चोरण्या खुशीने धावशि पोरांसवे ।
काय साधणे आहे तुजला ? समजु तरी दे नवे ॥ १ ॥
सकल जगत हे उद्यमी व्हावे हेच तुझे सांगणे ।
स्पष्टचि कळते या जनतेला आता तव वागणे ।।
मागिल काळी भावचि धरूनी तुजसंगे खेळवे ।
तुकड्यादास म्हणे या काळी भारत झाले नवे ।। २ ।।
- मेडिकल कॉलेज नागपूर . दि . १३ - ०५ - १९५५