उमगले , उमगले , उमगले जगाचे कोडे

( जाति : छंद ) 
उमगले , उमगले , उमगले जगाचे कोडे ।। धृ० ।। 
जग हे मानवतेने भरले । 
मायामोह धरोनि पसरले । 
जे जे या तत्त्वासि विसरले । 
ते भ्रमले , ते श्रमले , भोगती    सदा   यमकुंडे ॥ १ ॥
जनता देव जयांना कळली । 
त्यांची मानवताही फळली । 
अपुली - परकी भाषा हरली । 
पावले,   पावले,    पावले     सुखाचे       हंडे ॥ २ ॥ 
येथे कोणि न परका आला । 
ज्याचा तोचि अनेकी झाला । 
तुकड्यादास म्हणे हा काला । 
समजले , समजले , समजले ज्ञान ज्या जोडे ।। ३ ॥ 
- श्रीगुरुदेव मासिक डिसेंबर ; १९४७