मूर्तिपुजा ही अमूर्त दावी, ध्येय असे नेत्याचे

.. (चाल : तुमबिन मोरी कोन..)...
मूर्तिपुजा ही अमूर्त दावी, ध्येय असे नेत्याचे
करणारे पूजिती मूर्ति पण, मर्म न जाणि तयाचे।।धृ०।।
अनन्य भावे शरण रिझावे गोड वचन गीतेचे।
अनन्यता ही न कळे कोणा, जाणति ते भाग्याचे ।।१॥।
साधु, संत हे सांगुनि गेले, दावुनि मार्ग सुखाचे।
वागुनि गेले अनन्यतेने, शास्त्र पहा सुजनाचे।।२॥|
म्हणता राम, राम मन होई, ध्येय होत रामाचे।
धैर्य जिवा ये रावण वधण्या, मार्ग असे सगुणाचे।।३॥।
तुकड्यादास म्हणे या पूजू, भाव धरुनि हे त्याचे।
जाउ चला हो, सहज सुखा वरु, वाह फूल सु-मनाचे।।४॥।