कैसी संध्या करावी स्वामी !
स्वानुभव- वर्णन
(चाल- झाली संध्या संदेह माझा.)
कैसी संध्या करावी स्वामी ! आता हो ? ।
गृह - चिंता लागली माझे माथा हो ॥
गंगा यमुना न दिसे माझे डोळा।
असि पदी वाढला मैल काळा ॥
स्वानुभव अंतरला वेगळा ।
कधी भेटे श्रीकृष्ण सांवळा हो ? ॥
सदबुद्धी ती उठुनि गेली सारी ।
माझे दया नाही हो अंतरी ॥
शमदम ना बाणती या शरीरी ॥
मुखी नाही श्री - नामाची थोरी हो ॥
शुद्धबोध झाकला सर्व माझा ॥
ममता - म्हातारी बैसली सर्व काजा ॥
भक्ति - बहीण वाजवी पोंग - वाजा ।
अंतरीचा तो क्रोध झाला राजा हो ॥
तुकड्यादास सहज शरण गेला।
सर्व वृत्त ऐसाचि बोलियेला ॥
सद्गुरुने चरणी ठाव दिला ।
लीनतेच्या योगेचि पार झाला हो ॥