ऊठ मनुष्या ! ऊठ जागुनी आळस का घेतला ?
( चाल : नरजन्मामधि नरा करूनि घे ... )
ऊठ मनुष्या ! ऊठ जागुनी आळस का घेतला ?
चहू बाजुस वणवा लागला ॥धृ0॥
कोणाचा भरवसा घेउनी बसला माडीवरी ?
सर्प हे चढती वरचे वरी ।
दार आडवे केले म्हणुनी चोर न येती घरा
कुणी हा पाठ दिला साजिरा ?
नेत्र लावुनी बसला म्हणुनी शत्रु न पाही तुला
कोण हा मंत्र बोलिला खुळा ?
( अंतरा ) ही ऐक - ऐक रे ? काळाची आरळी ।
वाटते जणू हा भारत संगळा गिळी ।
मग तुझी चाड का ? घेइल लाखो बळी ।
हो सावध - सावधान मित्रा ? हाक देतसो तला
करी काय ते स्मरुनि बुध्दिला ॥१॥
उदार तत्वांचा दाता तो गेला स्वर्गावरी
भाग्य मिळवोनी अपुल्यापरी ।
गर्जवली दुनियाच मृत्युने असा धुरंधर महा
मिळे दुर्मीळ जगा पुरुष हा ।
गुलामगिरितुनि मार्ग काढुनी स्वराज्य अपणा दिले
मोल ना त्याचे कुणि पाहिले ।
( अंतरा ) पण आज वाट तव काय कशी लावशी ?
दुर्दैव आडवे पडले हे राक्षसी ।
ऐकतो कोण तव ? प्रेमाने सांगशी ।
विचार कसला करीत बसला ? किती झाला गलबला
छातिशीं शत्रु पहा धडकला ॥२॥
चटकन घे अणि पटकन् वद तरि झटकन् हो सामुरी
सोड गळफासाची ही सुरी ।
प्राण पणाला लावुनि अपुला सेवा कर ही पुरी
नाहितर इथेच अपुला मरी ।
मृत्यूने हो अमर घाल घे माळ यशाची उरी
भूषवी भारतमाता खरी ।
( अंतरा ) ही आणिबाणिची वेळ न येई पुन्हा ।
हो सज्ज सुपुत्रा ! करी करी गर्जना ।
वाजु दे यशास्तव रणवाद्यें दणदणा ।
भीक न घाली कधी शत्रुला शरण न जव हो तुला
हाक तुकड्याचि ऐक रे ! खुला ॥३॥