आदौ नित्य - रुपा सदा स्मरुनिया वृत्ति स्थिरावे मनी

(श्री सद्गुरु स्तुत्याष्टक)
(सायंकाळी धूप आरती नंतर म्हणावयाचा पाठ ... )
आदौ नित्य - रुपा सदा स्मरुनिया वृत्ति स्थिरावे मनी ।
न ढळे चित्त कदा तया वरुनिया निश्चित राहे जनी ॥
देहादि जड भास नाशवतसा जाणी मनी जो सदा I
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥१॥
ऊर्ध्वी वृत्ति सदा नटे धरुनिया शांति स्व - शांति जया ।
नेत्री प्रेम विराग राग हरुनी घेई जनांची मया ॥
अंतर्बाह्य समान ध्यान धरुनी जाळी विकारी - मदा ।
श्रीमत आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥२॥
साक्षी होउनिया स्वइन्द्रियमना पाही स्वये जो रुपा I
दृश्यी दृश्यपणे अ - लक्ष करुनी घे स्व - स्वयेची कृपा ॥
मिथ्याभास यथा सदा हरुनिया राही विदेही सदा I
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥३॥
देही देह हरे विदेहहि नुरे मग जे तयाती उरे ।
ज्ञानाज्ञान मरे विकल्प घसरे तै नित्य वृत्ती धरे ॥
कर्ते कारण कार्य हे हरुनिया भोगे जगी जो सदा ।
श्रीमत आडकूजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥४॥
जाणी जाणपणा मनी विसरुनी सर्वस्वि भक्ति भली I
जैसे गंग - तरंगवत् उठे आटे जलीचे जली ॥
पाही पाहनिया न पाहतपणा लोकी दिसे तै सदा ।
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥५॥
विश्वी विश्वरुपी नरी नररुपी जो जै तयाचे रुपी ।
आकाश - स्वरुपी नव्हे नभ - रुपी रंगे अनंगे - रुपी ॥
आपै - दूजपणा नसे किमपिही देवेंद्र देवो गदा ।
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥६॥
चैतन्यी प्रगटे हरे नटनटे कैवल्यी एकी वटे ।
ज्याचे नाम मुखी सदा बरळता जन्मादि दुःखे हटे ॥
जन्माजन्म मिटे मनी रुप रटे ऐसी जयाची वदा ।
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥७ ॥
जेव्हा देह असे असेपण नसे तै राहणी ज्या वसे ।
जैसा जो स्व - असे तसे रुप दिसे राही न राही असे ।
तुकड्यादास मना ! यया धर म्हणे जाशील मोक्षपदा ।
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥८॥
ध्याता नाम मुखी मने करुनिया पावेल सायुज्यता ।
इच्छा मानसि कोणती धरुनि घे देईल सर्वस्वता ॥
स्मरता अष्टक हे मुखी अनुदिनी इच्छा पुरी सर्वदा ।
श्रीमत् आडकुजी - पदा भज मना ! मग जन्म नाही कदा ॥९॥