काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऐसे
काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऐसे ।
दु:ख हे मोहपाशाचे, अता तिळमात्र ना सोसे ॥धृ०॥।
क्षणक्षण काळ हा टपला, लिहाया कर्म जे केले ।
चुकेना भोग कोणाला, करू जैसे भरू तेसे ॥।१॥।
स्वार्थि हे लोक अवघेची, न कोणी साथ दे अंती ।
न कामी देह-इंद्रिय हे, न लागू याचिये कासे ॥।२॥।
सखा जो पंढरी-राणा, जिवाचा एक कनवाळू ।
भजू त्यासी मनोभावे, यथामति जाणतो जैसे ।।३॥।
म्हणे तुकड्या जगाची ही, उपाधी घात करणारी ।
कळो आले अता सगळे, न कोणी यात संतोषे ।।४॥।